गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक : रमजान ईद दिनी  दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्रीचा   उच्चांक : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

कोल्हापूर ता.११: गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.

           पुढे बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले कि, गोकुळने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. याचे फलित म्हणून गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण.  या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी २२ लाख ३१ हजार २८४ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २० लाख ६३ हजार ६९२ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६७ हजार ५९२ लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.

           “गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्‍हणून मी त्‍यांना संचालक मंडळाच्‍यावतीने धन्‍यवाद देतो.” असे चेअरमन डोंगळे यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच रमजान ईद व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले तर डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले. तसेच मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

          याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाळासो खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळोखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!