खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मिळणार पोलंड देशाचा बेणे मेरितो पुरस्कार : दिल्ली येथील पोलंड दूतावासात संपन्न होणार कार्यक्रम

कोल्हापूर :

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाच्या वतीने बेणे मेरीतो पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्प मध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

14 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते 1942 ते 1949 या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.
यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले होते की, “ज्या वेळी जग युद्धाने उध्वस्त झाले होते, युरोप उद्ध्वस्त झाला होता आणि भारताचा काही भाग भयंकर दुष्काळाच्या खाईत होता, तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपतींनी या पोलिश कुटुंबांना मानवतावादी आधारावर दत्तक घेतले. आम्हाला ही भावना स्मारक आणि संग्रहालयाच्या माध्यमातून जिवंत ठेवायची आहे, ज्यामुळे इंडो-पोलिश संबंध अधिक दृढ होतील.”

भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते त्यांना ‘द बेने मेरिटो’ हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. पोलंड प्रजासत्ताकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवार, 26 एप्रिल 2022 रोजी नवी दिल्लीतील पोलिश दूतावासात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!