पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आय.आय.टी. मुंबईच्या इन्टीग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नदी प्रदूषण रोखुया : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
स्वच्छ भारत मिशन टप्पा ॥ अंतर्गत १०० दिवसांचा धडक कार्यक्रम
कोल्हापूर :
आय.आय.टी. मुंबईच्या इन्टीग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजीव्दारे सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले.
आय.आय.टी. मुंबई येथील पथक कोल्हापूर येथे दाखल झाले असून या दोन पथकांनी सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणा-या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या. यात, पहिल्या पथकामार्फत विक्रमनगर, उंचगाव, मोरेवाडी, आर.के.नगर, बुध्द गार्डन, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, परताळा, शाम सोसायटी, राजोपाध्ये नगर येथे भेट देवून पाहणी केली.
तर, दुस-या पथकामार्फत गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी (ता. करवीर), तळंदगे, तारदाळ, खोतवाडी, इंगळी, रुई, कबनूर, कोरोची, चंदूर (ता. हातकणंगले), यड्राव, टाकवडे वेस (ता. शिरोळ) येथील स्थळांची पाहणी केली.
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदे अंतर्गत उपाययोजना करण्यासाठी तसेच राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन टप्पा ॥ अंतर्गत १०० दिवसांच्या धडक कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे प्रस्तावित आहे. मुंबईच्या आय.आय.टी. पथकामार्फत दुपारच्या सत्रामध्ये जिल्हास्तरावर आयोजित कार्यशाळेमध्ये इन्टीग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. आय.आय.टी मुंबई येथून योगेश राऊत, ऋषिकेश हिवरेकर, मोहित ढोका यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नदी प्रदूषण रोखुया
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
पंचगंगा नदी व इतरही स्त्रोत प्रदुषण मुक्त होण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहून नवीन तंत्रज्ञान, टेक्नोलॉजीचा अधिक प्रभावीपणे वापर झाल्यास प्रदुषण नियंत्रीत करता येवू शकेल. प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक स्त्रोताला नियंत्रित करावयाचे आहे, असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केले.
पंचगंगा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक स्रोताला नियंत्रित ठेवण्यासाठी तांत्रिक उपाययोजनांचा वापर करून नदी प्रदूषण थांबविण्यास प्रयत्न करायला हवेत. कमीत कमी खर्चामध्ये स्वच्छ भारत मिशन तसेच 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीमधून उपाययोजना करावयाच्या आहेत. शक्य त्या सर्व गावांमध्ये सर्व कुटुंबांना नरेगातून शोचखड्डे उपलब्ध करून देवून सांडपाणी व्यवस्थापन करायचे आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जिल्ह्यातील महापूराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसेच हा प्रकल्प दीर्घकाळ कार्यान्वित रहावा, या दृष्टीने जिल्ह्याचा सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्याठी मार्गदर्शन व्हावे, असे सांगितले.
आय.आय.टी मुंबईचे योगेश राऊत यांनी गावाची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, सांडपाण्याचे प्रमाण व प्रवाहानुसार सांडपाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान ठरते, असे मत व्यक्त केले.
इन्टीग्रेटेडेट वेटलँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाबाबत मोहित ढोका यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)चे अरुण जाधव, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने, पर्यावरण तज्ञ उदयसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे सर्व उपविभागांचे उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व कोल्हापूर महानगरपालिका तसेच नगर परिषदांचे उप अभियंता, शाखा अभियंता, प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.