संभाव्य पूर परिस्थिती समन्वयाने हाताळा – पालक सचिव प्रवीण दराडे

◆ अलमट्टी धरण विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा
◆ स्थलांतरित नागरिकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरवा
◆ जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टीम लीडर’ म्हणून तर अन्य विभागांनी ‘टीम वर्क’ म्हणून काम करावे
◆ जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे पालक सचिवांकडून कौतुक

कोल्हापूर :

संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन पूरपरिस्थिती पूर्व, पूरपरिस्थिती काळात व पूर परिस्थिती पश्चात आवश्यक असणाऱ्या कामाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करुन सर्व विभागांनी मिळून समन्वयाने परिस्थिती हाताळावी, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी केल्या.

जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. हवामान खात्यानेही 8 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्याशी संवाद साधला होता. यानंतर आज पालक सचिव प्रवीण दराडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर परिस्थिती नियोजनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

पालक सचिव प्रवीण दराडे म्हणाले, अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे विभागाशी तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही त्रुटी राहता कामा नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. कोणतीही घटना घडल्यास तात्काळ त्याठिकाणी पोहचण्यासाठी विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना करुन आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टीम लीडर’ म्हणून तर अन्य सर्व विभागांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ‘टीम वर्क’ म्हणून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
पालक सचिव श्री. दराडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांचे व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा. स्थलांतरीत नागरिकांच्या कँम्पमध्ये आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन द्या. नेमुन दिलेल्या अधिकाऱ्यांनी त्या-त्या ठिकाणांची पाहणी केल्याचा अहवाल मागवून घ्या. पुराचे पाणी येणाऱ्या मार्गांवर व पुलांवर पोलीस कर्मचारी तैनात ठेवा. पूरपरिस्थितीत अशुध्द पाण्यामुळे रोगराई पसरु नये, यासाठी पुरबाधित नागरिकांना व स्थलांतरीत कँम्पमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा करा. नागरिकांनी शुध्द अथवा उकळून पाणी पिण्याबाबत जनजागृती करा. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरु नये, यासाठी जंतुनाशक फवारणी व अन्य आवश्यक ती खबरदारी घ्या. महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपघात घडू नये, यासाठी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. पूरपरिस्थितीत नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!