ज्येष्ठ नेते प्रा.डॉ. एन.डी.पाटील : चळवळीतील युवा कार्यकर्त्यांचे आधारवड हरपले : राजेंद्र सूर्यवंशी
कोल्हापूर :
कोणत्याही आंदोलनाची धार म्हणजे प्रा.डॉ.एन.डी पाटील सर. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आंदोलने, चळवळीच्या केंद्रस्थानी सर असायचे. केवळ आणि केवळ शेतकरी, कष्टकरी, कामगार, उपेक्षित, गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर रस्त्यावर झगडणारे हे अद्वितीय नेतृत्व. जनहितासाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीत काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा ते आधारवड होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे चळवळीत येऊ पाहणाऱ्या युवकांना नवचेतना प्राप्त होत असे. या लढवय्या नेतृत्वाची प्राणज्योत मालवल्यामुळे सामाजिक चळवळीत काम करणारा प्रत्येकजण पोरका झाला आहे, अशा भावना पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील सर यांचे निघून जाणे मनाला वेदना देणारे आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते असल्याने त्यांच्या मार्गदर्शनावाखाली अनेक वेळा काम करता आले.
टोलविरोधी आंदोलन, इरिगेशन फेडरेशन, वीज दरवाढ विरोधी आंदोलन अशा अनेक प्रसंगी सरांचे नेतृत्व अनुभवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात सहभागी होताना, सामाजिक काम हाती घेताना मोठी ऊर्जा मिळत असे.
सरांची कोणतेही आंदोलन पाहिले तर सर्व आंदोलनात ते अभ्यासपूर्ण व आक्रमकपणे आपले विचार मांडून प्रशासन व सरकारला ते धारेवर धरत असत. त्यांच्या विचारात मोठी ताकद होती. न डगमगता त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. आयुष्यभर त्यांनी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे केलेले काम सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रेरणादायी व मार्गदर्शक असेच आहे. येणाऱ्या काळात एन. डी.पाटील सरांचे विचार घेऊन सामाजिक चळवळ, परिवर्तनाची चळवळ कायम ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सरांना अंतकरणापासून श्रद्धांजली वाहतो !