देशातील कोल्हापूर पद्धतीचा पहिला दगडी बंधारा मोजतोय अंतिम घटका
सांगरूळ बंधाऱ्याचे सात पिल्लर निखळले : धरणास धोका : शेतीच्या सिंचनाचा प्रश्न
करवीर :
सांगरूळ ता. करवीर येथील जिल्ह्यातील स्वातंत्र्य काळातील, सहकार तत्वावर देशातील कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा दुरुस्ती अभावी अंतिम घटका मोजत आहे. बंधाऱ्याचे सात पिल्लर निखळले आहेत,यामुळे धरणास धोका निर्माण झाला असून शेतीच्या सिंचनाचा,व सुमारे आठ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.या धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

१९५२ साली सहकारी तत्त्वावरील देशातील पहिला कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा कुंभी नदीवर बांधण्यात आला. सांगरूळ ,कोपार्डे, कळंबे,आडूर, चिंचवडे ,सावर्डे, मल्हारपेठ, मरळी येथील पिण्याच्या पाण्याचा सुटला व सुमारे 1400 एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला. या धरणाची आयुर्मर्यादा बघता आता धरणाची पिलर गेल्या चार वर्षात निखळत आहेत. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ असताना त्यांनी सुमारे वीस लाख ७२ हजार रुपये, विशेष बाब म्हणून धरण दुरुस्ती साठी दिले होते. यानंतर शेतकऱ्यांच्या वर पाणी पट्टी मध्ये शंभर रुपये जादा वर्गणी काढून सुमारे ४५ लाख रूपये खर्चातून धरणाची डागडुजी करण्यात आली आहे.
दरम्यान या खर्चात ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेला आहे ,तसेच आतील भिंतींना भगदाड पडले आहेत. तसेच पश्चिमेकडील सात पिल्लर निखळले आहेत . पावसाळा तोंडावर आला आहे पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरुस्ती डागडुजी न केल्यास बंधारा वाहून जाण्याची भीती शेतकरी यांच्यातून व्यक्त केली जात आहे. कमीत कमी पाणीपट्टीत शेतीला पाणी दिले जाते हे धरण कुंभि परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा बनला आहे, हे धरण ऐतिहासिक वास्तू म्हणून जोपासली पाहिजे टिकले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे .
===================
उत्तम कासोटे, धरण संस्था अध्यक्ष,
पावसाळ्यापूर्वी बंधारा दुरुस्त करणे गरजेचे आहे, कोगे खडक बंधाऱ्यावरील वसूल पाटबंधारे खात्याने पन्नास टक्के धरण संस्थेला वसुल द्यावा यातून दुरूस्ती करता येईल व संस्था टिकेल.