पेट्रोलची किंमत ६० रुपये प्रति लीटरच्या खाली येण्याची शक्यता

दिल्ली :

पेट्रोल डीझेलच्या किंमती वाढत असल्याने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डीझेल वस्तू आणि सेवा कर  जीएसटीच्या अंतर्गत आण्याचा निर्णय घेऊ शकतात.  मंत्री स्तरावरील समिती एक राष्ट्र एक दर या धोरणाअंतर्गत  पेट्रोलियम उत्पादनांवर समान कर लावण्याचा विचार करु शकते.

यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये जाणाऱ्या  रेव्हेन्यूच्या सध्याच्या यंत्रणेमध्ये मोठे बदल करण्याचा मार्ग मोकळा होईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील समिती १७ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोल-डीझेल जीएसटीअंतर्गत आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. सध्याची कर रचना आणि जीएसटी कर रचना लक्षात घेतल्यास सर्वाधिक जीएसटी लावून इंधन जीसएसटीअंतर्गत आणण्यात आलं तरी पेट्रोलचे दर जवळजवळ अर्ध्याने कमी होतील.

जीएसटी यंत्रणेनुसार कोणताही बदल करायचा असल्यास नियोजित समितीमधील तीन चतुर्थांश सदस्यांकडून त्यासाठी होकार येणं गरजेचं असतं. यामध्ये सर्व राज्यांचे आणि क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात. काहींनी जीएसटी यंत्रणेमध्ये इंधनाचा समावेश करण्याला नकार दिला आहे.

महाराष्ट्राने मात्र २०२१-२२ च्या अर्थसंकल्पादरम्यान  पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी ते वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्याची गरज असून केंद्र सरकारने तसा प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र पाठिंबा देईल असं जाहीर केलं आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना १० मार्च रोजी ही घोषणा केलेली. इंधन सुद्धा जीएसटीअंतर्गत आल्यास राज्यांच्या कमाईचा एक मार्ग केंद्र सरकारच्या हाती जाईल अशी भीती काही राज्यांनी व्यक्त केलीय.

पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या अंतर्गत आणण्यात आलं तर देशातील सर्व राज्यांमधील इंधनाचे दर समान होतील. इतकच नाही जीएसटी परिषदेने कमी स्लॅबमध्ये पेट्रोलियम उत्पादनांना स्थान दिल्यास इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील. सध्या भारतामध्ये चार प्रकारचा जीएसटी आकारला जातो.

यामध्ये सर्वात कमी पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार प्रकार आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास केंद्र आणि राज्य सरकार करांच्या नावाखाली इंधनावर १०० टक्के कर वसूल करत आहे. त्यामुळे सर्वाधिक जीएसटी लावला तरी पेट्रोलची किंमत ६० रुपये प्रति लीटरच्या खालीच राहील असा अंदाज आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारला जातो. दोन्ही करांचा बोजा एवढा जास्त आहे ३५ रुपयांचे पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९५ ते ११५ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचलं आहे. जीएसटी एक जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. त्यावेळेच राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर करांच्या रुपाने अधिक अवलंबून असल्याने जीएसटीमधून इंधनाला वगळण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच सीतारामन यांनी इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.अर्थमंत्रालय किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सीएनबीसी टीव्ही १८ ने यासंदर्भातील विचार सरकार करत असल्याचे वृत्त दिलं आहे.

पेट्रोलियम उत्पादने ही राज्यांसाठी कर वसुली रेव्हेन्यू मिळवण्याचं प्रमुख साधन आहे. त्यामुळेच जीएसटी परिषद इंधनाला सर्वात मोठ्या स्लॅबमध्ये ठेऊन त्यावर उपकर लावू शकते. सरकारी आकडेवारीनुसार सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये पेट्रोलियम क्षेत्राने सराकरी तिजोरीमध्ये दोन लाख ३७ हजार ३३८ कोटी रुपयांचे योगदान दिलं आहे. त्यापैकी एक लाख ५३ हजार २८१ कोटी केंद्राचा वाट तर ८४ हजार ५७ कोटी राज्यांचा वाटा होता. वर्ष २०१९-२० मध्ये राज्य आणि केंद्राने पेट्रोलियम क्षेत्रामधून एकूण पाच लाख ५५ हजार ३७० कोटी मिळवले. हे सरकारच्या कमाईच्या १८ टक्के इतका तर राज्यांच्या कमाईच्या सात टक्के इतके आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!