देशात पाण्यातील ग्रीन हायड्रोजन वर धावणार गाडी
जळगाव :
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावात विकासाची ब्लू प्रिंट मांडली आहे. कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासह देशात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा दिला. एकट्या जळगाव जिल्ह्यात एकूण पंधरा हजार कोटी रुपयांची कामं पूर्ण केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच अजून १५ हजार कोटींची कामं होणं बाकी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
येणाऱ्या काळात वाहनं, विमानं, रेल्वे, विविध कंपन्या पाण्यातून निघणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार आहेत. दिल्लीत माझ्याकडे देखील अशाप्रकारची गाडी असून ती पाण्यातून निघणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालते. त्यामुळे देशात पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यावर काम सुरू आहे. यामुळे भारत हा ऊर्जा आयात करणारा देश नव्हे, तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल. परिणामी भारताला नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल यासारखी इंधनं आयात करावी लागणार नाही. देशातील शेतकरी केवळ अन्नदाताच नव्हे, तर उर्जादाता देखील बनेल, असंही गडकरी यावेळी म्हणाले.