पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन
पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहात माहिती आणि जनसंपर्क विभागाने विश्वासार्हता जपली
-ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद
डिजिटल युगात पत्रकारांनी नवतंत्रज्ञानात सक्षम असावे
- माहिती उपसंचालक डॉ.खराट
कोल्हापूर :
सध्याच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारितेचे स्वरुप बदलत असताना देखील राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने आजवर विश्वासार्हता जपली असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद यांनी काढले.
जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयात 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आज कार्यक्रम झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट तसेच कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुक बागवान तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद म्हणाले, माध्यमांमध्ये स्पर्धा वाढली आहे. पत्रकारांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. अशावेळी कामाचा ताण, दबाव व धावपळ वाढत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारितेच्या माध्यमातून गतीने माहितीची देवाणघेवाण करताना पत्रकारांनी अभ्यासपूर्ण संयमाने, तारतम्याने पत्रकारिता करणे आवश्यक आहे. समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारे विश्वासार्ह लिखाण करण्यावर भर द्यायला हवा. जेणेकरुन वाचकांच्या मनात आपली ओळख वर्षानुवर्षे जपली जाईल, असे सांगून ते म्हणाले, पूरपरिस्थिती, भूकंप, पाऊस अशा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत तसेच विविध आकडेवारीशी संबंधित माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या बातम्या ‘प्रमाण’ मानल्या जातात.
ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल पाटील म्हणाले, सोशल मिडियात जलद गतीने बातम्या पाठवित असताना बिनचूक माहिती पाठविणे आवश्यक आहे. बातमी मागचा स्त्रोत महत्वाचा असून या मूळ स्त्रोतापर्यंत पोहोचून बातमीदारी करावी. वृत्तसंस्थेच्या नावाने ओळख असण्यापेक्षा कामातून ओळख निर्माण करा, यासाठी खूप मेहनत करा.
ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी म्हणाले, पत्रकारांनी निर्भिड आणि नि:पक्षपाती पत्रकारिता करावी. वेगळ्या विषयांवर लेखन करा. बातमीत वेगळेपण शोधा. समाजातील घटकांना, समाजाला न्याय देण्यासाठी, समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारिता करा. पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत. आपला जनसंपर्क वाढवून त्याचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करा, असे त्यांनी सांगितले.
माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट म्हणाले, माध्यमांनी वाचक आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेवून त्यानुसार त्यांना माहिती पुरवायला हवी. यासाठी त्या-त्या वृत्तसंस्थांकडून वेळोवेळी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता व्हायला हवी. डीजिटल युगामध्ये वावरताना पत्रकारांनी इंटरनेट, सोशल मिडीयाच्या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वत:ही सक्षम व्हावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले. पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देवून पत्रकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी व आव्हाने मनोगतातून मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली पाटील यांनी केले, तर आभार सहायक संचालक फारुक बागवान यांनी मानले. कार्यक्रमास विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.