या जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस
मुंबई :
मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई शहर, उपनगरांमध्येही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान आज सायंकाळी कोल्हापूर मध्ये ही पावसाने हजेरी लावली.
दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता….
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस म्हणजेच १ डिसेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
वादळी वारे..
उत्तर महाराष्ट्रात वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ४५-५५ किलोमीटरवरून ताशी ६५ कि.मीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ’दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. प्रतितास जाण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.