शाहू छत्रपती महाराजांना ‘ चेतन नरके गटाचा ‘ पाठिंबा !
विजयाचा पाया करवीरमध्ये रचणार : चेतन नरके
कोल्हापूर : दिल्लीत शिवशाहूंचा समतेचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती यांना बिनशर्थ पाठिंबा देत आहे. काँग्रेस, महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष आणि नरके गट एकत्र आल्यामुळे शाहू छत्रपतींच्या विजयाचा पाया करवीरमधूनच रचला जाईल, असे प्रतिपादन गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली.
करवीर तालुक्यातील वाकरे फाटा येथील श्री विठाई चंद्राई लॉन येथील चेतन नरके गटाच्या मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी उमेदवार शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, करवीर मतदारसंघाचे आमदार पी.एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात बोलताना चेतन नरके यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचा दिशा कोणती असेल हे ठरविणारा हा मेळावा असल्याचे सांगून लोकसभा लढवायची म्हणून गेल्या अडीच वर्षापासून मी जिल्हाभर संपर्क दौरा केला. सामान्य माणसांशी नाळ जोडली. त्यांच्या हृदयात स्थान मिळवले. मेळाव्याला झालेली गर्दी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आहे.
नरके पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे समतेच्या विचाराचा हा वारसा पुढे चालवित आहेत. त्यांची आणि माझे वडील अरुण नरके यांची ५० वर्षापासून मैत्री आहे. शाहू छत्रपती आणि माझी वैचारिक बैठक जुळली आहे. त्यांना पाठिंबा देत आहे. येथून पुढे आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार आणि राजकारणात काम करू.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘चेतन नरके यांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी सहकार आणि समाजकारणात पुण्याई मिळवली आहे. पुण्याईचा तो वारसा सांभाळून ठेवण्याची जबाबदारी चेतन नरके यांची आहे. त्यांनी गेली अडीच वर्ष स्वत:च्या प्रचारासाठी मोठे कष्ट घेतले होते. वाडया वस्त्यावर जाऊन संपर्क साधला होता.त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेसचा आग्रह शाहू छत्रपतींसाठी राहिला. मात्र त्यांनी जे कष्ट घेतले ते भविष्यात वाया जाऊ देणार नाही. त्यांनी आता शाहू छत्रपतींसाठी दोन पावले पुढे जाऊन प्रचार करावा.’
गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, ‘शाहू छत्रपती यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. ५० वर्षाची मैत्री आहे. केएसएत मी पदाधिकारी आहे. कौटुंबिक स्नेह आहे. त्यांच्या हस्ते माझा अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सत्कार झाला होता. इतके ऋणानुबंध आहेत. म्हणून चेतनला मीच म्हटलं, निवडणूक लढविण्यासंबंधी फेरविचार कर. त्यांनी ऐकलं. महाराजांना पाठिंबा दिला”
मेळाव्यास उमेश नरके, युवराज काटकर, रणजित पाटील, प्रकाश मोरे, संतोष शेळके, शिवसेनेचे सुहास पाटील यांची भाषणे झाली.चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. मेळाव्याला सत्यशील संदीप नरके, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर, यूथ बँक संचालक विश्वास पाटील, आनंदा बेलेकर, दगडू टोपकर, संजय मोरे, रंगराव मोळे, एस. के पाटील, अशोक पाटील, पैलवान संभाजी पाटील, चंद्रकांत जाधव, तेजस मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती