‘परिवर्तन महाशक्ती’ च्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न ; कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने स्थापित झालेल्या ‘परिवर्तन महाशक्ती’ चा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. परिवर्तन महाशक्ती ला राज्यभरातील ४२ घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे आणखी ताकद वाढली आहे.
‘महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वच्छ, सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी, महाराष्ट्राला विकास मार्गावर घेवून जाण्यासाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ चा पर्याय आहे.’ असे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
‘ज्यांनी ज्यांनी आलटून पालटून सत्ता भोगली, त्यांच्या विरोधात ‘परिवर्तन महाशक्ती’ च्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे रहावे, तसेच सत्ताधारी व विरोधक जाती, पातीचे झेंडे आणतील, आपण तिरंगा झेंडा हाती घेवू!’ असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्राचा ७/१२ कोणत्याही राजकारण्यांच्या बापजाद्याच्या मालकीचा नाही, तो कष्टकरी, शेतकरी, हमाल, मजूर व घाम गाळणाऱ्यांचा आहे, तो कधीही आम्ही तुमच्या नावावर होवून देणार नाही.’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्राला राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी व रोजगाराच्या संधी देण्यासाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ चा पर्याय देत आहोत’ असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
‘गेल्या ७५ वर्षात सगळे पक्ष सत्तेत येवून गेले परंतु महाराष्ट्राच्या प्रती विकास, सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत कोणीही गंभीर दिसत नाही यामुळे आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत.’ असे मत महाराष्ट्र राज्य समिती चे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.
‘आजपर्यंत शेतकरी व सैनिकाला न्याय मिळाला नाही कारण ते कधीही एकत्र झाले नाहीत, परंतु आता शेतकरी व सैनिक ‘परिवर्तन महाशक्ती’ मध्ये संघटित झाल्यामुळे न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.’ असा विश्वास भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी व्यक्त केले.
या मेळाव्याचे प्रस्तावित धनंजय जाधव यांनी केले तर मेळाव्याचे आभार आप्पासाहेब कुढेकर यांनी व्यक्त केले.या मेळाव्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे मा. आमदार वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे प्रमुख मा. आमदार शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्ष, जय विदर्भ पार्टी, महाराष्ट्र विकास पक्ष सहभागी होते.