राजू शेट्टींपाठोपाठ आमदार प्रकाश आवाडेंचा सत्ताधारी गटाला पाठिंबा : आघाडी भक्कम झाल्याचा सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचा दावा
कोल्हापूर :
गोकुळची निवडणूक एन टप्प्यात चांगलीच रंगात आली आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आज सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार पी.एन.पाटील बुधवारी झालेल्या पत्रकार बैठकीत जिल्ह्यातील मोठा नेता सत्तारुढ आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे आणि ते लवकरच कळेल असे वक्तव्य केले होते. शेट्टी, आवाडे यांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी आघाडीला इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात बळ मिळाल्याचे, आघाडी भक्कम झाल्याचे संबंधितांकडून बोलले जात आहे.

कोल्हापूर येथील बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी , आजऱ्याचे अशोक आण्णा चराटी यांनी आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. शेट्टी यांच्या पाठोपाठ आमदार आवाडे यांनीही आज सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
कोल्हापुरातील आवाडे यांच्या निवासस्थानी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जि. प. सदस्य राहूल आवाडे यांच्यासोबत चर्चा झाली. याप्रसंगी जवाहर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, राजू मगदूम उपस्थित होते.
निवडणुकीत आवाडेंचा पाठिंबा मिळावा म्हणून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी इचलकरंजीत जाऊन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत चर्चा केली होती. तसेच विरोधी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवाडेंची भेट घेतली होती. मात्र सत्तारुढ आघाडीच्या नेत्यांना आवाडेंचा पाठिंबा मिळविण्यात यश मिळाले. आमदार आवाडे यांनी आजच्या सत्ताधारी नेत्यांच्या बैठकीत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला.