परभणी व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा
परभणी :
परभणी व नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला.यामध्ये तूर, कापूस आणि सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची अपेक्षा असताना अद्यापही काही भागांमध्ये पंचनामे झालेले नाहीत. परभणी जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे घरे, जनावरे व घरातील साहित्य वाहून गेले परंतु अद्यापपर्यंत त्यांना कोणतेही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. यामुळे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व इतर घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पाहणी दौरा केला.
यावेळी छत्रपती संभाजीराजे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, अतिवृष्टी सारख्या संवेदनशील घटना घडलेली असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे १० दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांचे आश्रु पुसायला शेतीच्या बांधावर आलेलो आहोत. शेतकऱ्यांना पुढील ८ दिवसांत मदत मिळाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना खुर्ची बाहेर खेचल्या शिवाय राहणार नाही.’
प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले, प्रशासनाने जर पुढील ८ दिवसांत शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही मोर्चा काढायला देखील मागे पुढे पाहणार नाही.
यावेळी वझूर गावातील ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा या नेतेमंडळींसमोर मांडल्या. तसेच पाहणी करायला शेतात गेल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध देखील फुटला. तिघांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, सरचिटणीस धनंजय जाधव,, उपाध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे पाटील, प्रहार पक्षाचे शिवलिंग भोजने, भारतीय जवान किसान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.