करवीरमध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा : आम.पी.एन. पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल
करवीर :
काँग्रेसच्या करवीरमधील जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने चिखली ते वडणगे पदयात्रेत हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. जनसंवाद यात्रेची करवीरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. आमदार सतेज पाटील व आमदार पी.एन.पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रा कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात पार पडली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वडणगे येथे जाहीर सभा झाली. आमदार पी.एन.पाटील यांनी यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी वडणगे येथील सभेत बोलताना
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निव्वळ भुलथापा मारून जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. देशातील सर्वच प्रमुख व्यवस्थेमध्ये आपल्याला मर्जीतील माणसे नेमून लोकशाही धोक्यात आणण्याचा घाट रचला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला मराठ्यांची मते मागण्याचा नैतिक अधिकार नसून भाजपने देशाला कर्जाच्या खाईत लोटले असल्याची टीका केली.
#जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, सध्याचे भाजपचे राजकारणामुळे वातावरण गढूळ बनले आहे. लोकांना काँग्रेसच आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यामुळे चंदगडपासून करवीरपर्यंतच्या सर्व नागरिकांनी जनसंवाद पदयात्रेला भरभरून प्रतिसाद दिला.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, देशातील अनेक मोठ्या कंपन्या खाजगी उद्योजकांना विकत आहेत.
तरुणांना भडकावून देश संपवायचे काम मोदी सरकार करत आहे. वाढलेल्या महागाईवर, बेरोजगारीवर बोलायला तयार नाहीत. देशातील सर्व घटक नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. एच. पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील- भुयेकर, शंकरराव पाटील यांची भाषणे झाली. प्रारंभी प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले. अमित पाटील यांनी आभार मानले. पदयात्रेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, सुरेश कुराडे, बाजीराव खाडे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, डॉ. सुनील पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.