जिल्ह्यातील आगीची मोठी घटना
कोल्हापूर :
पाडळी खुर्द ता.करवीर मध्ये उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळाला,यामुळे सुमारे २८ शेतकऱ्यांचे, सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत बांधावरची अनेक झाडे जळून खाक झाली आहेत.यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे.आग लागून मोठ्या प्रमाणावर ऊस पेटल्याची, जिल्ह्यातील ही मोठी घटना घडली आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी खुर्द गावाला एकूण सुमारे ७५० हेक्टर शेतजमीन आहे. बहुतांश शेतकरी ऊस पीक घेतात.येथील ऊस कुंभी,भोगावती,डॉ. डी.वाय,दालमिया,व इतर साखर कारखान्यांना ऊस पाठविला जातो.
यावर्षी ऊसतोड मजूर टंचाई असल्याने, आता पर्यंत फक्त तीस टक्के उसाची तोड झाली होती.
आज सकाळी सुमारे ११ वाजता नदी काठ परिसरात उसाच्या फडाला अचानक आग लागली,गेल्या आठवड्या पासून उन्हाचे प्रमाण ही वाढले आहे. यामुळे आगीने भडका घेतला.आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली ,की बघता बघता सुमारे ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.यावेळी काही शेतकऱ्यांनी नदी काठावरील शेती पंप सुरू करून पाणी मारण्याचा प्रयत्न केला, काही शेतकऱ्यांनी ऊस तोडून भांगा मारला,यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली.
ऊस तोडणी मजूर टंचाई असल्याने आता जळालेला ऊस तोडणी करण्याचे आवाहन आता शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिले आहे.
या आगीत नदी काठावरील बांधावरील अनेक झाडे झुडपे जळून खाक झाली.यामुळे पर्यावरणाची हानी झाली. सरपंच तानाजी पालकर, सदस्य प्रकाश पाटील, वैभव पाटील, नानासो पाटील ,तलाठी जी.एम. शिंदे, पोलीस पाटील सुरेश पाटील, कोतवाल संदीप पाटील, सदस्य, यांनी घटनेचा पंचनामा केला यावेळी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आगीत उसाचे नुकसान झालेले शेतकरी यांची नावे असे, नामदेव पाटील, शिवाजी पाटील, तुकाराम पाटील, वैभव पाटील,ज्ञानू कळके, धनाजी पाटील, भीमराव पाटील, नामदेव पाटील, दत्ता पाटील, तुकाराम पाटील ,बाबुराव पाटील, वसंत पाटील,आनंद पाटील, मारुती पाटील, उत्तम पाटील ,रमेश पाटील, हरी पाटील ,बळवंत पाटील, अशोक पाटील, धनाजी पाटील, दिलीप पाटील, श्रीकांत पाटील पांडुरंग पाटील आनंदा पाटील, यांच्यासह लहान क्षेत्र असणारे शेतकरी यांचेही उसाचे नुकसान झाले आहे.