राजर्षी शाहू आघाडीबरोबरच राहणार : करवीर विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांचा निर्धार
दूध उत्पादकांना ८१ टक्के परतावा देणारा देशातील एकमेव गोकुळ दूध संघ : पी.एन.पाटील
फुलेवाडी येथील अमृत हॉलमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यातील ठराव धारकांचा मेळावा
करवीर :
गोकुळने नेहमीच सर्वसामान्य दूध उत्पादक सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दुधाचे दर पडले असतानाही दूध उत्पादकांना कोणतीही झळ न पोहोचवता ८१ टक्के परतावा देण्याबरोबर दूध दरातील फरक ९८ कोटी रुपये देणारा गोकुळ दुध संघ राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव दूध संघ आहे. यामुळेच ठरावधारक राजर्षी शाहू पॅनेलबरोबर आहेत, असे प्रतिपादन आमदार पी.एन.पाटील यांनी केले.

फुलेवाडी येथे आमदार पी.एन. पाटील यांच्या उपस्थितीत करवीर विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी उपस्थित सर्व ठरावधारकांनी गोकुळचा कारभार चांगला चालला असून राजर्षी शाहू आघाडीबरोबरच राहण्याचा एकमुखी निर्धार केला. मेळाव्यात पन्हाळा तालुक्यातील ६१ पैकी ५७ ठरावधारक उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील होते.
यावेळी बोलताना आमदार पी. एन.पाटील पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघाचा कारभार पारदर्शीच आहे. नियमानुसार उत्पादकांना उत्पन्नातील ७० टक्के द्यायचे आणि ३० टक्के खर्चाला द्यायचे. पण आम्ही दूध उत्पादकांना ८१ टक्के परतावा वाटप करतो आणि फक्त १९ टक्क्यात खर्च भागवतो. हे गोकुळ दूध संघ चांगला चाललेल्याचे द्योतक नव्हे काय? म्हणूनच गोकुळची राज्यात व देशात एक नंबर दूध संघ म्हणून गणना होते.गोकुळ चांगला चालल्याशिवाय चारशे कोटींच्या ठेवी आहेत काय? असा प्रश्न उपस्थित करत कोरोना काळातही ३, १३ व २३ तारखेला न चुकता बिले दिली.
मधल्या काळात तीन – चार महिने संपूर्ण दुधाची पावडर केली. तरीसुद्धा ठेवी असल्यामुळे उत्पादकांना वेळेत बीले देवू शकलो. आम्ही शेतक-याच्या घामाचा पैसा शेतक-याला देतोय. त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीला प्रचंड ताकदीने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील, बाजार समितीचे मा. संचालक शशिकांत आडनाईक, एन.सी.पाटील, शाहू काटकर, सुहास राऊत, भरत मोरे, पी.डी.हंकारे यांची मनोगते झाली. यावेळी ठरावधारक उपस्थित होते.