नागदेववाडी येथील नूतन ग्रामपंचायत सदस्या सखुबाई निगडे यांच्यावर काळाचा घाला
करवीर :
जानेवारी मध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या, आणि कधीही ग्रामपंचायतची निवडणूक न लढवणाऱ्या महिलेला संधी मिळाली, नागदेववाडी (ता. करवीर) येथील सखुबाई लक्ष्मण निगडे (वय ६५) यांना ही संधी मिळाली,त्या निवडून ही आल्या पण ग्रामपंचायतची पायरी चढण्या अगोदरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नुकतीच नागदेववाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक झाली. यात कोणतीही राजकीय कारकिर्दी नसणाऱ्या सखुबाई लक्ष्मण निगडे-निगवेकर यांना संधी देण्यात आली.सखुबाई यांच्या घराला कोणत्याच निवडणुकीत संधी दिली गेली ना म्हणून सर्व भाऊबंदांनी एकत्र येत या घरातील व्यक्तीला संधी देण्याचा निर्णय झाला. पण सुनबाई तांत्रिक अडचणी मुळे व मुलग्या साठी महिला आरक्षण असल्याने शेवटी सखुबाई यांना प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेस प्रणित महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीतून संधी दिली. आणि तब्बल ४० मते विरोधी उमेदवारा विरोधात जादा घेत निवडणुकीत विजयही मिळविला.
कोणतीही राजकीय कारकीर्द नाही; संस्थेत प्रतिनिधी नाही; पारंपरिक शेती व्यवसाय;असे चित्र असताना पहिल्यांदाच निवडणूक लढवली, अन त्या निवडूनही आल्या. पण नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही. अन सरपंच-उपसरपंच निवड होण्या आधीच सखुबाई यांना हृदयविकाराचा झटका आला अन नियतीने ग्रामपंचायतची पायरी चढण्या अगोदरच त्यांची संधी काळाने हिरावली. राजकीय आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्यानेे हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान निवडणूक सूत्रांशी संपर्क साधला असता अशावेळी पोट निवडणूकी,व निवडी बाबत आयोगाकडे मार्गदर्शन मागवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.