पंढरपूर : विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार :
७ ऑक्टोबर पासून दररोज दहा हजार भाविकांना दर्शन
Tim Global :
विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांना आता आपल्या देवाला डोळे भरून पाहता येणार असून ७ ऑक्टोबर पासून दररोज दहा हजार भाविकांना विठुरायाचं मुखदर्शन घेता येणार आहे. मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खूले राहणार आहे. दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत स्थानिक भाविकांना,नवरात्रोसत्वात महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.
भाविकांच्या आरोग्यासाठी सर्व खबरदारी समितीने घेतली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. राज्यातील मंदिरे ७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला . या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंदिर समितीचे सदस्य डॉ दिनेश कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महारज जळगावकर, शकुंतला नडगिरे, माधवी निगडे, नगराध्यक्षा साधना भोसले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
करोना बाबत सर्व नियमाचे पालन करण्यात येणार असून वय वर्षे दहा वर्षाच्या आतील, ६५ वर्षापुढील, गर्भवती महिला यांनी दर्शनासा येण्याचे टाळावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे तापमान तपासले जाणार आहे. तसेच दर्शन रांगेत भाविकांनी मुखपट्टी,योग्य अंतर, सॅनिटायझर आदी नियम बंधनकारक आहे.
दर्शनासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून तारीख, वेळ निश्चित करता येईल.मुख दर्शनाची रांग कासार घात येथून सुरु होणार आहे. तेथून दर्शन घेता येईल. मंदिरात दर्शनासाठी हार, नारळ, प्रसाद घेवून जाण्यास बंदी केली आहे.