नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा
कोल्हापूर :
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे दिनांक 12 ते 17 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नसून यामध्ये मोफत सहभागी होता येणार आहे. सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.
शासनाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर महारोजगार मेळाव्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. राज्यस्तरीय महारोजगार मेळावा हा उद्योजक तसेच बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापना व खासगी आस्थापना यांनी आपल्याकडील रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करुन मनुष्यबळाची मागणी नोंदवली आहे. मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांनी या वेबपोर्टलवर भेट दयावी. तसेच उमेदवार आपल्या मोबाईलमध्ये महास्वयम हे ॲप डाऊनलोड करुन या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टंद्वारे अथवा दुरध्वनीद्वारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
रोजगार मेळाव्यासंदर्भात काही अडचण, मदत किंवा अधिक माहिती हवी असल्यास 0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.