महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे :
६२३ पदांसाठी भरती परीक्षा राबवली जाणार
Tim Global :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) होणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२मध्ये ४६२ पदांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण ६२३ पदांसाठी भरती परीक्षा राबवली जाणार आहे. एमपीएससीने ही माहिती दिली.
एमपीएससीतर्फे ११ मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून ४६२ पदांचे अतिरिक्त मागणीपत्र देण्यात आल्याने या पदांची भर पडली आहे. त्यामुळे आता ६२३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी वयोमर्यादा १ एप्रिल २०२३ रोजी गणण्यात येईल. या व्यतिरिक्त सर्व पदांसाठी वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास, म्हणजे १ सप्टेंबर २०२२ रोजी गणण्यात येईल.
तसेच १७ डिसेंबर २०२१च्या शासन निर्णयानुसार १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील. पदसंख्या आणि आरक्षणात कोणताही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील वेळोवेळी एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.