जिल्ह्यात ३५४ हेक्टर पिकांचे नुकसान
पंचनामे झाले पूर्ण
कोल्हापूर :
जिल्ह्यात एप्रिलमध्ये वादळी वारे व अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी खात्याच्या वतीने पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.यामध्ये जिल्ह्यात २३२७ शेतकऱ्यांचे ३५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अवकाळी पावसातील गारपीट नुकसानीसाठी राज्य शासनाकडे ६५ लाखाची मागणी कृषी खात्याने केली आहे.
जिल्ह्यात एक एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत करवीर, चंदगड, शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामध्ये १४९५ शेतकऱ्यांचे १८६ हेक्टर ऊस पिक व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.
चंदगड तालुक्यात ४६८ शेतकऱ्यांचे १०३ हेक्टर वर ऊस व भाजीपाला काजू झाडाचे पिकाचे नुकसान झाले आहे. शाहूवाडी तालुक्यात १८ शेतकऱ्यांच्या चारा पिकाचे सुमारे दोन हेक्टर नुकसान झाले आहे. तातडीने कृषी खात्याच्या वतीने पंचनामे पूर्ण केले आहेत.
यामध्ये ऊस,झाडे, भाजीपाला असे एकूण २३२७ शेतकऱ्यांचे ३५४ हेक्टर
वरील पिकांचे नुकसान झाले असे पंचनाम्यात समोर आले आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार वाढीव दराने कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ८५०० रुपये,
बागायत क्षेत्राला हेक्टरी १७ हजार रुपये, फळ पिकासाठी २२,५०० हेक्टरी दोन हेक्टर च्या मर्यादित, तसेच कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये व बागायत शेतकऱ्यांना किमान दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. कृषी आयुक्तालय व राज्य शासनाकडे कृषी खात्याने या सर्व पिकांसाठी ६५ लाखाची मागणी केली आहे. अशी माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली. दरम्यान नुकसानग्रस्त गारपीट झालेल्या क्षेत्राला पाण्याचा ताण पडत असल्याचे चित्र आहे.
……………….
दत्तात्रय दिवेकर ,
जिल्हा कृषी अधीक्षक,
एक ते २० एप्रिल मधील
गारपीट अवकाळी पाऊस झालेल्या तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यासाठी शासनाकडे ६५ लाखाची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा काढावा व पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा.
………………….
- करवीर तालुक्यात सर्वाधिक ऊस पिकाचे नुकसान,
*पिकांचे ५० टक्के हून अधिक नुकसान, - गारपीट झालेल्या क्षेत्रात उसाचे उत्पादन घटणार,
- ऊस पिकाला पिक विम्यामध्ये समाविष्ट करावे,
- दोन हेक्टरच्या पुढील क्षेत्र भरपाईसाठी धरावे,
- शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळावी,