बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी : आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची पत्राद्वारे जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे मागणी

कोल्हापूर

 बदलापूर (ठाणे) येथील आदर्श विद्या मंदिरात दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आज (दि. 21 ऑगस्ट) आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, बदलापूर येथे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा कर्मचारी नेमावेत तसेच प्रत्येक वर्गात, स्टाफरूम आणि मैदान परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. मुलींच्या सुरक्षितेसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
आमदार जयंत आसगावकर पुढे म्हणाले, राज्य सरकार शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे. या भरतीला मी वेळोवेळी विरोध करत आलो आहे. या कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे शाळेतील महत्त्वाचे दस्तावेज धोक्यात येणार आहेत. या पलीकडची गंभीर बाब म्हणजे आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या साऱ्या बाबींचा विचार करता शासनाने ही कंत्राटी भरती रद्द करून ती कायमस्वरूपी करावी. राज्य शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला जबर शिक्षा देण्यात यावी तसेच घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी आपल्या सूचना राज्य शासनाला कळवू असे सांगितले. दरम्यान या घटनेचा कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या शिष्टमंडळात एस. डी. लाड, दादासाहेब लाड, भरत रसाळे,आर. वाय. पाटील, राहुल पोवार, के. के. पाटील, उदय पाटील, राजेंद्र कोरे, वस्त्रद सर, वरक सर, दिपक पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!