कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट (ब) मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात करवीर तालुक्यातील छोट्याशा गणेशवाडी गावचे दादासो मधुकर माने यांनी तब्बल चार वेळा मुख्य परीक्षेस अपयश येऊन हार न मानता जिद्द, चिकाटीने पाचव्यांदा मुख्य परीक्षा पास होऊन यशाला गवसणी घातली. गावचा सुपुत्र फौजदार झाला म्हणून गणेशवाडी गावाने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
कोथबिर, झेंडू यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गणेशवाडी गावच्या दादासो मान हे कोल्हापुरातील मेन राजाराम कॉलेज येथून ५६% गुणांनी बारावी उत्तीर्ण झाले. बारावीनंतर त्यांनी सैन्यदलात भरतीसाठी प्रयत्न सुरु केला. पण त्यात दोन वेळा अपयश आले. पुढे मेन राजाराम कॉलेज येथून सन २०१२ ला भूगोल विषयातून पदवी संपादन केली. पदवीनंतर सिंधुदुर्ग पोलिस भरतीत दोन गुण कमी पडले. निराश न होता त्यांनी २०१५ साली कोकणातून पुन्हा कोल्हापूर गाठले व पीएसआय पदाचा कर अभ्यास सुरु केला. मध्यमवर्गीय शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले माने २०१६ साली मुलाखतीपर्यंत पोहचला, पण पदरी अपयश आलेच.
पुन्हा सलग चार वेळा मुख्य परीक्षेस अपयश येऊन देखील अपयश पचवून पाचव्यांदा ८ ऑक्टोबर २०२२ ची पूर्व परीक्षा मोठ्या आत्मविश्वासाने दिली. मुख्य परीक्षा २ ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली. त्यानंतर सरदार मित्तम आयडियल अँकेडमी यांनी शारीरिक चाचणीसाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. शारीरिक चाचणी पास झाल्यानंतर मुलाखतीसाठी अतिग्रे यांच्या विद्या प्रबोधिनीचे मार्गदर्शन घेतले.१६ जुलै २०२४ रोजी मुलाखती झाल्या. गुरुवारी आयोगाने गुणवला यादी प्रकाशित केली व दादासो माने यांच्या अथक प्रयत्नांना यश आले.
गणेशवाडी गावातील लोकांचे काबाडकष्ट हीच माझी मूळ प्रेरणा, मार्गदर्शक होती. परीक्षेला अपयश आले म्हणून खचलो नाही, तर पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास सुरू ठेवला. केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. अभ्यासात सातत्य व चिकाटी कायम ठेवल्याने यश मिळाले. —‘दादासो माने