पालकमंत्री सतेज पाटील
सुंदर इमारती बनवून शहराच्या सौंदर्यात बांधकाम विभागाचे योगदान : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर :
कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. वैद्यकीय रूग्णालय, नवीन प्रशासकीय इमारत अशा कामांसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. तर, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय अशा सुंदर इमारती निर्माण करून शहराच्या सौंदर्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान राहिले आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली सुसज्ज इमारत निर्माण केली त्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भेटून विनंती केली आहे. वैद्यकीय हॉस्पीटल, प्रशासकीय इमारत व अन्य विकासात्मक कामांसाठी जास्तीत जास्त निधी जिल्ह्यासाठी मिळवून आणण्यासाठी प्रयत्न करू. प्रलंबित असणारी कामे पूर्ण करावीत. कोविड काळातही सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केले त्याबद्दल मनापासून सर्वांचे कौतुक करतो.
ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याला शोभेल अशी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागान उभी केली आहे.यापुढेही सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती उभ्या करून सौंदर्यात योगदान दिले आहे. रखडलेली कामे पूर्ण करणे महत्वाचे आहे. विशेषत: खराब रस्ते, पडलेले खड्डे दुरूस्त करावेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचे नियोजनबद्ध काम करा. जिल्ह्यासाठी निधी आणण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल.
अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील कामकाजाबाबत आढावा दिला. कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांनीही इमारतीबाबत आढावा दिला. यावेळी, मधुकमल कन्स्ट्रक्शन सांगली, मे. विजयलक्ष्मी फर्निसिंग सांगली, ब्रम्हेश इंजिनिअरिंग, वैशाली चौगुले, कोव्हिड योध्दे पांडुरंग पोवार, राहुल माळी, सारिका कुंभार, धनंजय भोसले, किरण हेगडे, संजय माने, अविनाश पोळ, दया लोहार आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.