कोल्हापूर :
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करण्याकरिता लागणारा निधी हा सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेकरिता जिल्ह्यासाठी एक युनिट मंजूर झाले आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनीच यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांनी केले आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ / संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा / पांजरपोळ / गोरक्षण संस्था यांना राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्यक्रमाने निवड करावयाची आहे.
मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशीन युनिटमध्ये सायलेज बेलर, हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र, (किमान 2 मे.टन प्रति तास), ट्रॅक्टर व ट्रॉली, वजनकाटा, हार्वेस्टर व मशीन शेड यांचा समावेश राहील. सायलेज बेलर व हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र या मशीनरीची खरेदी करणे आवश्यक आहे. योजनेमधून खरेदी केलेल्या मशीनरीची शासनाच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करता येणार नाही. यासाठी संस्थेस 500 रूपयांच्या मुद्रांकांवर रितसर करारनामा करुन द्यावा लागेल. तसेच विभागाचे अधिकारी भेटीस आल्यानंतर संस्थेने संबंधित अधिकाऱ्यांना मशीनरी दाखविणे बंधनकारक असेल.
योजनेचा उद्देश मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे आहे. मुरघास निर्मितीसाठी कच्च्या मालाचे (हिरवी वैरण) उत्पादन अथवा खरेदी, मजुरी खर्च, इंधन खर्च व इतर अनुषंगिक खर्च, मशीनरी दुरुस्ती खर्च संस्थेला स्वत:ला करावा लागेल. या योजनेसाठी प्रति युनिट रुपये 20 लाख खर्चापैकी 50 टक्के म्हणजे रुपये 10 लाख केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून उर्वरित 50 टक्के रुपये 10 लाख संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहेत.
संस्थेच्या स्वहिस्सा निधीकरिता संस्था स्वनिधीमधून खर्च करु शकेल अथवा आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकेल. बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची असेल.
योजनेबाबत अधिक माहिती व योजनेसाठीचा अर्ज संबंधित तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्या कार्यालयात उपलब्ध असून दि. 10 मार्चअखेर परिपूर्ण अर्ज सादर करावयाचे असल्याचेही श्री. पठाण यांनी सांगितले आहे.