करवीर :
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे कोरोना काळातील मार्च २०२० ते ऑक्टोंबर २०२० पर्यंतचे विज बिल माफ करावे, थकीत वीज बिले असलेल्या ग्राहकांचा विज पुरवठा महावितरणने खंडित करू नये , यासह विविध मागण्यांचे निवेदन ताराबाई पार्क कोल्हापूर येथील महावितरण अभियंत्यांना देण्यात आले. हे निवेदन सहाय्यक अभियंता दीपक पाटील यांनी स्वीकारले.
२०१९ साली आलेला महाभयंकर पूर आणि त्यानंतर सुरू झालेले कोरोना महामारीचे थैमान यामधून सामान्य नागरिक आता कुठे स्थिरावत आहे तोपर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट देशावर पसरले आहे. सर्व देशातील जनतेचे तब्बल तिसरे वर्ष कोणताही नफा न होता नुकसानीत जात आहे, त्यामुळे सगळेच त्रस्त आहेत.
अशा या बिकटप्रसंगी महावितरणची थकीत बाकी वसुली करण्यासाठी ग्राहकांचा विज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार अधिकारी करत आहेत. सबब हा बळजबरी वसुलीचा खाजगी सावकारीसारखा प्रकार त्वरित थांबवण्याचे निर्देश राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे देण्यात आले.
तसेच कोरोनाच्या कालावधीतील मार्च २०२० ते ऑक्टोंबर २०२० पर्यंतचे विज बिल माफ करावे,
कमी दाबाच्या घरगुती विज बिल वसुलीमध्ये नाहक तगादा लावू नये, कडक उन्हाळा समोर असताना विज पुरवठा खंडित करून शेती पंप थांबवून पिके वाळवू नयेत, व्यापारी, उद्योजक यांच्या उद्योगधंद्यांची घडी बसेपर्यंत त्यांनाही सांभाळून घ्यावे, कुणालाही दंड, चक्रवाढ व्याज असे जुलमी उपाय केले असल्यास ते रद्द करावेत अशा मागण्याही करण्यात आल्या.
यावेळी श्रीधर गोंधळी (बालींगा), विजय गुरव, डॉ.आनंद दादा गुरव, राणोजी सुतार (शेनवडे), तानाजी गुरव, सचिन कांबळे, प्रवीण बनसोडे, प्रशांत कांबळे , नितीन कांबळे, सुंदर कांबळे, अशोक खरवडे, नागेश शिंपी, अमित नागटीळे आदी उपस्थित होते.