कसबा बीड येथे शेतात महिलेला सापडली सुवर्णमुद्रा
कोल्हापूर :
सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशी आख्यायिका असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड गावात सोमवारी (दि. १०) रोजी सकाळी शेतात बनाबाई यादव या महिलेला सुवर्णमुद्रा सापडली. प्रकाश तिबिले यांच्या घराजवळ रस्त्याला लागूनच डाव्या बाजूला त्रिशूळ छाप सुवर्णमुद्रा म्हणजेच सोन्याचा बेडा सापडला.
सोमवारच्या दिवशी बेडा सापडल्यामुळे बनाबाई त्याला महादेवाचा प्रसाद मानून आनंदित झाली आहे. बनाबाईना सापडलेला बेडा ६ मिमीचा असून त्यावरील अंकण सुस्पष्ट व त्रिशूळ छाप ,टिंबांचे आकार आढळतात.दुसऱ्या बाजूला उभवटा दिसून येतो. गावात दरवर्षी सुवर्णमुद्रा अथवा बेडा सापडण्याच्या घटना घडतात. मृगाच्या पहिल्या पावसामुळे सापडणारे बेडे प्राचीन कसबा बीडच्या इतिहासाला उजाळा देतात.