उमेदवारांना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण धोरण निश्चित
कोल्हापूर :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) वतीने पुर्व व मुख्य परीक्षेसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र उमेदवारांना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सारथी संस्था पुणे मार्फत देण्यात आली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे ही महाराष्ट्र शासनाची कंपनी असून या कंपनी मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने सारथी, पुणे ही कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. सारथी संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा येथील 4 हजार 163 चौ.मी. जमीन मुख्या रस्त्यालगत मिळाली आहे.
सारथी, पुणे संचालक मंडळाची सभा संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 जून 2021 रोजी घेण्यात आली. या बेठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. सारथी संस्थेमार्फत एम.फील / पीएच.डी करिता छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच 34 अनुपसिथ्त उमेदवारांना मुलाखतीस एक अधिकची संधी देण्याचे ठरले. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) साठी संयुक्त (पुर्व) व (मुख्य) परीक्षांसाठी तसेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेव्दारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित होतात. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेव्दारे (CET) लक्षित गटातील 250 उमेदवारांना पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) साठी सन 2020 मध्ये 74 रिक्त पदे जाहीर करण्यात आली. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेव्दारे लक्षित गटातील एकूण 400 उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.
सारथी, पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी 2019-20 मधील MPSC पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण 24 हजार रूपये अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य 15 हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वत:च्या आवडीनुसार निवड करू शकतात.
सारथी संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्यात आली होती. मागविण्यात आलेल्या घोषवाक्यांपैकी संचालक मंडळाने शाहू विचारांना देवूया गती, साधूया सर्वांगीण प्रगती या घोषवाक्याची निवड केली. हे घोषवाक्य जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते, त्यामुळे स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेमार्फत त्यांना 10 हजार रूपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याचे सारथी संस्थेमार्फत कळविण्यात आले आहे.