जिल्हा परिषद विषय समित्यांवर महिला राज
कोल्हापूर :
जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडी झाल्या. चारही सभापती पद महिलांना देण्यात आल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर महिला राज आले . जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडी सोमवारी पार पडल्या. यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडी कडे लक्ष लागून होते. सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते, महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सकाळी पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अखेर विषय समित्यांच्या सभापती पदासाठी नावे निश्चित करण्यात आली.

खासदार संजय मंडलिक गटाच्या शिवानी भोसले यांना महिला व बालकल्याण समिती सभापती पद,तर आमदार प्रकाश आबीटकर गटाच्या वंदना जाधव यांना बांधकाम, माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या कोमल मिसाळ यांना समाजकल्याण आणि अपक्ष सदस्या रसिका पाटील यांना शिक्षण व अर्थ सभापती पद देण्यावर शिकामोर्तब झाले.
चारही सदस्य नामनिर्देशन पत्र दाखल केल्या नंतर, दोन वाजता झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या चारही सभापतींची निवड करण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी किशोर पोवार होते.
जिल्हा परिषद नूतन अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली . निवडीनंतर सभापतींच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला .
रसिका अमर पाटील, अर्थ व शिक्षण सभापती,
अर्थ व शिक्षण खात्याच्या माध्यमातून व ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाची गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा जिल्हा परिषदेच्या मालकीची करण्यासाठी प्रयत्न करू, आणि जिल्हा परिषद उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहू ,कोरोना काळात शिक्षण खात्याची जी घडी विस्कळीत झाली ती सुरळीत लावण्याचा प्रयत्न करू व शैक्षणिक स्तर वाढीसाठी,आणि शाळा सक्षम करण्यासाठीआपला सातत्याने प्रयत्न राहील.