शेतकरी संघ बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा : शेतकरी संघ सभासदांच्या मालकीचाच, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी
कोल्हापूर :
कोल्हापुरातील सहकाराची अस्मिता असलेल्या
शेतकरी संघाच्या मालकीची इमारत ताब्यात घेण्याच्या प्रवृत्ती विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हुकुमशाही पद्धतीने शेतकरी बझारची इमारत ताब्यात घेतल्याच्या आरोप करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भवानी मंडप ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघालेल्या मोर्चात ‘ कोल्हापूरची अस्मिता शेतकरी संघ वाचवा, शेतकरी संघाची स्थावर मालमत्ता हडपणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार असो, छुपा रुस्तुम कोण, पालकमंत्रीशिवाय दुसरे कोण ? नही चलेगी,नही चलेगी – कोल्हापूर मे हुकूमशाही नही चलेगी अशा घोषणा देत शेतकरी संघ सभासदांच्या मालकीचाच असल्याचे ठासून बजावले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील,शहराध्यक्ष आर.के.पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शेतकरी संघाचे प्रशासक सुरेश देसाई, अजितसिंह मोहिते, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अर्बन बँकेचे संचालक संभाजीराव जगदाळे, उदय नारकर, शेतकरी संघाचे कार्यकारी संचालक सचिन सरनोबत, माजी संचालक यंकाप्पा भोसले, विजय पोळ, धनाजी सरनोबत, जी. डी. पाटील, विजय चौगुले, बाबा इंदुलकर ,बाबासाहेब देवकर, मुकुंद देसाई यांच्यासह विविध संघटनाचे प्रतिनिधी व शेतकरी संघाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर तेथे आमदार ऋतुराज पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी सरला पाटील, भारती पोवार, सुनील मोदी,प्रतापसिंह जाधव, शिवाजीराव परुळेकर, इंद्रजीत सावंत , अनिल घाटगे, धनाजी दळवी, शाहीर सदाशिव निकम, सुभाष देसाई, राजू जाधव, शंकर शेळके आदी सहभागी झाले होते.