गोकुळ : निवडणूक यंत्रणेची मतदान प्रक्रियेसाठीची कामे सुरू
कोल्हापूर :
गोकुळ निवडणुकीबाबतचा निर्णय सोमवारी (दि.२६) सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही ही संदिग्धता कायम असली तरीही निवडणूक यंत्रणेने मतदानाची तयारी पूर्ण करण्यासाठी आपली कामे सुरू ठेवली आहेत.
२ मे रोजी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ४ मे रोजी कसबा बावडा येथील रमणमळा येथील शासकीय बहुद्देशीय हॉल याठिकाणी मतमोजणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या शाळा , महाविद्यालये अशा ३५ ठिकाणी मतदान केंद्रे तालुकानिहाय निश्चित केली जाणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मतपत्रिका छपाई कामालाही गती देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षितता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.