कोण ठरणार महाराष्ट्र केसरी : कोल्हापूरचा पृथ्वीराज की मुंबईचा विशाल ?
कोल्हापूर :
महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज सायंकाळी पाच वाजता अंतिम लढत होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. मानाच्या महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी कोण ठरणार कोल्हापूरचा पृथ्वीराज की मुंबईचा विशाल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.
विशाल बनकर, पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गावचा विशाल महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या आहे. गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे, मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण घेतोय. ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशाल बनकरने सुवर्णपदक पटकावले होते.
महाराष्ट्र केसरी गदेसाठी एकमेकासमोर भिडणारे दोन्ही मल्ल तुल्यबळ असे आहे. स्पर्धेतील दोघांची कामगिरी चमकदार अशी राहिली आहे. त्यामुळे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत.