कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाची निवडणूक कोरोनासारख्या संकटाच्या काळातच होत आहे. या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असतानाच शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४ वर्षे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे ठरावधारकांत कोरोनाच्या प्रसाराची भीती निर्माण होऊ लागली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर आठ ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होते. कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये सुभाष सदाशिव पाटील यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सुभाष पाटील हे डोणोली येथील कै. सदाशिव पाटील दूध संस्थेचे ठरावधारक होते. मागील आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर ठरावधारक आणि उमेदवारी अर्ज भरलेले काही इच्छुक उमेदवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.