आ. ऋतुराज पाटील
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या केएमसी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. केएमसी महाविद्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून गेली 38 वर्षे केएमसी महाविद्यालय सुरू आहे. अत्यंत अल्प शुल्कामध्ये या महाविद्यालयाने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील , आमदार चंद्रकांत जाधव यांची सुद्धा यासाठी मदत घेणार आहे.
प्राचार्य प्रशांत नागावकर म्हणाले की, नॅक कमिटीने पुनर्मूल्याकन करताना महाविद्यालयात चांगल्या सुविधा असाव्या अशा सूचना केल्या. त्यानुसार अद्ययावत संगणक लॅब,जनरेटर, सी सी टी व्ही , सौर ऊर्जा प्रकल्प, मॉडर्न क्लासरूम, कंपौंड भिंत दुरुस्ती, सुशोभीकरण, ग्रंथालय आधुनिकीकरण या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे असल्याचे सांगितले.
याला आमदार ऋतुराज पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी पुढाकार घेऊ , असे सांगितले.
यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, किरण भोसले, प्रा. जे. एम. शिवणकर, प्रा. एस. एम. शेख, पी. डी. तोरस्कर, प्रा. एस. पी. कांबळे, प्रा. रेडेकर आदी उपस्थित होते.