लम्पीस्कीन : गोकुळतर्फे मोफत लसीकरण – चेअरमन विश्वास पाटील.
(सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा)
कोल्हापूरः ता. १३.
लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोकुळमार्फत मोफत लसीकरण, संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीचा पुरवठा करून “लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले आहे” अशा शब्दांत गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी, एल.एस.एस. व कृत्रिम रेतन सेवक यांच्यामार्फत मोफत लसीकरणाचे नियोजन केले आहे असेही चेअरमन पाटील यांनी म्हटले आहे. जनावरांना लम्पी स्कीनचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर जिह्यात पंधरा दिवसापूर्वी जनावरांना लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे काही जनावरे लम्पीस्कीनने बाधित झाली. हा प्रकार समजताच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळ हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेउन अतिग्रेला पोहचले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचून जनावरांचा गोठा पाहिला. जनावरांवर उपचार करण्याविषयी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. तसेच इतर काही ठिकाणी बाधित जनावरे असतील तर आवश्यक उपचारास तत्काळ सुरुवात करावी असे सांगितले.
गोकुळच्या पशुवैद्यकीय केंद्र येथे आवश्यक उपाययोजना, उपचाराच्या सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. हातकणंगले तालुका व इचलकरंजी परिसर वगळता जिल्ह्यात लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव कमी आहे.
दरम्यान गोकुळ दूध संघाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. एखाद्या गावात लम्पीस्कीनने बाधित जनावरे आढळली तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. गोकुळमार्फत संबंधित जनावरांवरती आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. लम्पीस्कीन या संसर्गाविषयी उत्पादकांनी घाबरुन जाउ नये. आवश्यक ती काळजी घ्यावी.
“ गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यासोबत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे इतर जनावरांपासून वेगळी करावीत. गोठ्याची साफसफाई, स्वच्छता करावी. गोचिड व माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावराविषयी संघाकडे संपर्क साधावा. जनावरांवर उपचार करुन घ्यावेत. गोकुळमार्फत सुरू उपलब्ध असलेल्या लसीकरणाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांना करुन द्यावा. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. ”असे आवाहन चेअरमन पाटील यांनी केले आहे.