मुंबई :
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.स्वर हरपला, वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.
लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.