राधानगरीचे प्रांताधिकारी व फराळेचे सरपंच
यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज रविवारी रंगेहात पकडले
राधानगरी :
राधानगरीचे प्रांताधिकारी व फराळेचे सरपंच
यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज रविवारी रंगेहात पकडले.
स्टोन क्रशर वरील कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान ( वय ४०, मूळ रा. बीड) व फराळेचे सरपंच संदीप जयवंत डावर ( वय ४१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रविवारी रंगेहात पकडले.यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
येथील तक्रारदार यांचा लिंगाचीवाडी (ता. राधानगरी) येथे स्टोन क्रशर व्यवसाय आहे. या उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ते खराब होणे, धुळीचे प्रदूषण, असे त्रासदायक प्रकार घडत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आल्याने सदर व्यवसाय बंद करणेबाबत ग्रामपंचायत फराळे व राधानगरी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांनी क्रशरवर नोटीस दिल्या होत्या.
कारवाई न होण्यासाठी सरपंच डवर यांनी स्वतः साठी १ लाख रुपये व उपविभागीय अधिकारी प्रधान यांच्यासाठी १० लाख रुपये लाचेची मागणी केली.
प्रधान यांनी डवर यांच्या लाच मागणीस दुजोरा देत तक्रारदारास लाच रक्कम डवर यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे लाच रक्कमेतील पहिला हफ्ता म्हणून साडे ५ लाख रुपये लाचरुपात स्वीकारताना डवर याला पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.