कोल्हापूर :
कोल्हापूर विमानतळासंदर्भात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अनुज अग्रवाल व विमानतळ प्राधिकरण नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीस कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हेदेखील उपस्थित होते.
या बैठकीत कोल्हापूर विमानतळ येथे नाईट लँडींग, धावपट्टी विस्तारीकरण, कार्गो हब निर्मिती आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १३७० मीटर लांबीची आहे. ही धावपट्टी २३०० मीटरपर्यंत वाढविण्यासाठी लागणारी ६४ एकर जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया विहीत कालावधी ठरवून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यापूर्वी १९०० मीटरची धावपट्टी कार्यान्वित करण्यासाठी व नाईट लँडींगसाठी लागणाऱ्या ‘ अँप्रोच लाईटस्’ ची उभारणी येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे या बैठकीत ठरले.
विमान मार्गात असणारे सर्व अडथळे काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी हालचाली गतिमान कराव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. या अडथळ्यांच्या पाहणी व तपासणीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची तज्ञ समिती लवकरच कोल्हापूर विमानतळास भेट देणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानाचे लँडीग व टेकअॉफ होताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी कामांची प्राथमिकता ठरवून सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत व कोल्हापूर विमानतळ अद्ययावत होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.