कुंभीच्या कारभाराला गैरव्यवस्थापनाची कीड लागली : चेतन नरकेंची सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका
कोल्हापूर :
डी.सीं.नी कधीही कारखान्यात राजकारण आणलं नाही. घरातून स्वतः डबा आणून काम केले. मात्र यांचे नेमके उलटे आहे. यांच्या अहवालातच खोट आहे. एक खड्डा काढून दुसरा खड्डा म्हणजे कर्ज काढून बिले दिले आहेत. याने कर्ज कुठे कमी झाले. कुंभीच्या कारभाराला गैरव्यवस्थापनाची कीड लागली असल्याची घणाघाती टीका गोकुळ संचालक चेतन नरके करून सत्तातर घडवू आणि कारखाना वाचवू असे आवाहन केले.
कुडित्रे येथील राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या जाहीर सभेत अध्यक्षस्थानी संभाजी पाटील होते.
यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, अहवालच खोटा देणारे सत्ताधारी आणखी किती लबाड बोलणार. भूमिपुत्रांना किती त्रास दिला हे सर्वांना माहीत आहे. आम्ही आमच्या जमिनी कारखान्यासाठी दिल्या आहेत. आमच्या हृदयात कारखाना आहे. आम्ही सत्तेत आल्यावर कारखाना कर्जमुक्त करूच शिवाय एकाही कामगाराच्या नोकरीला धक्का लागणार नाही असा विश्वास दिला.
ऍड.प्रकाश देसाई म्हणाले, को जनमधून नफा आहे आणि तो एफआरपी देण्यासाठी वापरला असे अध्यक्ष म्हणत आहेत तर मग कर्ज एफआरपी द्यायला काढले का को – जनचा बोजा भरायला काढले. हा प्रकल्प कर्जमुक्त झाला म्हणून तरी सांगा. राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही, तुमच्या या गैरकारभारामुळे निकालानंतर तुम्हाला सभासद नक्की विश्रांती देतील.
यावेळी बाळासाहेब खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, बाजीराव खाडे, दादू कामिरे, प्रा.टी.एल पाटील, प्रकाश मुगडे यांची भाषणे झाली. पै.संभाजी पाटील, आनंदराव पाटील, बी.एच.पाटील यांच्यासह पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.