शाहू आघाडीने माती परीक्षण केंद्र सुरू केले, तुम्ही बंद पाडले : बाजीराव खाडे
कोल्हापूर :
अध्यक्ष नरकेंनी कारखाना चांगला चालवला असता तर आम्ही नक्कीच आलो नसतो. पण तुमच्या भ्रष्ट कारभारामुळे तुम्ही आम्हाला यायची वेळ आणली. कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहोत. उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळातूनच शाहू आघाडीने माती परीक्षण केंद्र सुरू करून ते चांगले चालवले.पण तुमची सत्ता आणि हे केंद्र बंद पाडले, असे रोखठोक प्रत्युत्तर बाजीराव खाडे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
खुपिरे येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या सभेच्या अध्यक्षस्थानी रणजित पाटील होते. यावेळी
प्रकाश देसाई म्हणाले, १७ वर्षे सत्ता तुमच्या हातात, गैरकारभार तुमचा आणि आरोप आमच्यावर करता. अध्यक्ष नरके यांना काय बोलतोय हेच कळेना झालेय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुमच्याकडे संचालकांना तरी बोलण्याचा अधिकार आहे का. आमच्याकडे महिलाही विचार मांडू लागले आहेत. ही परिवर्तनची नांदी आहे. कारखान्याला लायला नेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घरी बसवा.
चेतन नरके म्हणाले, डी.सी. व अरुण नरकेंनी माणुसकीने नरके गट वाढवला. कुंभी कारखाना हे मंदिर मानून काम केले. पण या मंदिरात चुकीचे काय होत असेल तर गप्प कसे बसणार. राजकीय पोळ्या भाजून घेणारे डी.सीं.चे विचार विसरलेत. कारखान्याच्या निवडणुकीत कधीच पाकिट संस्कृती नव्हती. ती वेळ का आली? हे दुर्देव आहे, असा घणाघात करत परिवर्तन करण्याचे आवाहन केले.
यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, वर्षाला तोटा वाढतच चाललाय आणि म्हणे चांगला कारभार. केवळ नियोजनशून्य कारभार सुरू आहे. आज- उद्या कारभार सुधरेल म्हणून सभासदानी ३ वेळा सत्ता दिली. पण सुधारण्याचे नाव नाही. उलट कारखाना लुटला. त्यामुळे आम्हाला एकदा संधी द्या, कारखाना कर्जमुक्त करू, काटकसरीने कारभार करू अशी ग्वाही दिली.
शंकरराव पाटील म्हणाले, सभासद – कामगारांचे हित काय झाले नाही पण चंद्रदीप नरकेंना २ वेळा आमदारकी मिळाल्याने त्यांचे हित झाले. केवळ आणि केवळ आमदारकी डोक्यात गेल्याने कारखाना कर्जात बुडाला. शाहू आघाडीला मिळणारा पाठींबा पाहून त्यांना आता पराभव दिसू लागला आहे.
यावेळी बाळासाहेब खाडे,प्रकाश मुगडे, शिवाजी पाटील, सरपंच दीपाली जाभळे, तेजस्विनी पाटील, आकाराम पाटील, बबलू पाटील, दादू कामिरे, बाजीराव देवाळकर आदिनी सत्ताधाऱ्यांवर टिकेचा भाडीमार करत राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. सभेला हिंदुराव पाटील, सर्जेराव हुजरे, सुभाष निकम, एस.डी.पाटील, पी.बी. पाटील, राजेंद्र पाटील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.