राज्यभरात सुमारे दोन लाख हेक्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर जमिनीची गळती
कोल्हापूर :
कोरोना काळात शेतीने जनतेचे पोट भरले, कोरोना काळात शेतीनेच तारले असले तरी शेती आणि शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक आपत्ती, खतांची दरवाढ, शेतमालाचा हमीभाव, असे अनेक प्रश्न असून, दरवर्षी औद्योगीकरण आणि विविध कारणाने होणारी शेतीची गळती, इतर विल्हेवाट भविष्यात चिंतेची बाब ठरणार आहे. गेल्या पाच वर्षात राज्यभरात सुमारे दोन लाख हेक्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर जमिनीची गळती झाली आहे, म्हणजे पिकाखालील जमिनीची इतर विल्हेवाट लागली आहे.
शेती आणि शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक आपत्ती,महापूर, खतांची दरवाढ, शेतमालाचा हमीभाव, असे अनेक प्रश्न समोर आहेत. शेतीची होणारी गळती हा सर्वात मोठा प्रश्न आहे.राज्यभरात लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
२०१०/११ च्या कृषीगणनेनुसार राज्यभरात दरवर्षी सुमारे दीड लाख अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची भर पडत आहे. एका हेक्टर खाली सुमारे ६७ हजार शेतकऱ्यांची संख्या आहे.
२०१५/१६ च्या कृषीगणनेनुसार राज्यात एक कोटी 52 लाख ८५ हजार शेतकरी असून सुमारे दोन कोटी पाच लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र आहे.
२०१०/११ मध्ये एक कोटी ३६ लाख शेतकरी होते, आणि एक कोटी ९७ लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र होते. यामध्ये पाच वर्षात कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येऊन क्षेत्र वाढले असले तरी दर वर्षी शेतीची विभागणी होऊन लहान शेतकऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
सरासरी जमीन धारणा मध्ये भाऊ वाटण्या, खरेदी विक्री, तुकडे वारी, विभाजनामुळे शेती जमीन धारकांच्या सरासरी जमीन धारणेची सातत्याने घट सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या चाळीस वर्षात सरासरी जमीन धारणा ४.२८ हेक्टर वरून १.४४ हेक्टर पर्यंत खाली आली आहे.
तसेच राज्यभरात २०१०/११ च्या कृषीगणनेनुसार ५६ हजार हेक्टर क्षेत्राची गळती झाली होती, म्हणजे एन ए प्लॉट, विविध कारणासाठी शेतीची विल्हेवाट लागली आहे, २०१५/१६ च्या कृषी गणनेनुसार राज्यभरात तब्बल दोन लाख हेक्टर शेतीची औद्योगीकरणासाठी, प्लॉटिंकरण, विविध प्रकल्पासाठी गळती झाली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर शेतीची इतर विल्हेवाट लागली आहे ,अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली. शेतीची विल्हेवाट लागणे ही चिंतेची बाब आहे, असे जाणकारांच्यातूंन मत व्यक्त होत आहे.
दरम्यान कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय अडचणीत आले, नोकऱ्या गेल्या यावेळी अनेकांनी गावाकडे येऊन शेती केली, आणि शेतीनेच अनेक कुटुंबांना तारले आहे. आज सर्वत्र कृषी दिन साजरा केला जातो मात्र कृषी, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतच आहेत.
==================
ज्ञानेश्वर वाकुरे, जिल्हा कृषी अधीक्षक
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळावे, भाजीपाला ,फळपिके प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष द्यावे, शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती घ्यावी.
===============
शिवाजी मोरे,कोगे शेतकरी,
कोरोना काळात शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, शेतीमालाला भाव नाही, कृषिप्रधान देश नावापुरताच आहे, अन्नधान्याचे उत्पादन वाढले ,मात्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत.
स्वतंत्र भारतात शेतकरी आजही पारतंत्र्यात आहे.
गेल्या दहा वर्षातील राज्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र
२०१०/११ कृषी गणनेनुसार.राज्यात
१ कोटी ३६ लाख ९८ हजार शेतकरी,
१ कोटी ९७ लाख क्षेत्र,५६ हजार हेक्टर क्षेत्राची गळती इतर विल्हेवाट.दरवर्षी दीड लाख अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या.
२००१/०२ ते २०१०/११ मध्ये १८ लाख ५० हजार अत्यल्प १ हेक्टर हून कमी भूधारक शेतकऱ्यांची भर.
२०१५/१६ च्या कृषी गणनेनुसार…
राज्यात १ कोटी ५२ लाख ८५ हजार शेतकरी,
२ कोटी ५ लाख क्षेत्र,सुमारे २ लाख हेक्टर गळती ( इतर विल्हेवाट )कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्राची गळती इतर विल्हेवाट.
कोल्हापूर जिल्ह्यात…
२०१०/११ मध्ये ६ लाख ३८ हजार २८४ शेतकरी,४ लाख ५७ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र,
२०१५/१६ नुसार ६ लाख ६० हजार ६७६ शेतकरी,४ लाख ८८ हजार २३ हेक्टर क्षेत्र,
३.५ टक्के शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ,
७ टक्के क्षेत्रात वाढ,( लहान शेतकऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ )