जिल्ह्यातील कृषी उत्पादनांच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. यासाठी कृषी विभागातील तरुण अधिकाऱ्यांनी चाकोरीबाहेरील नवकल्पनांचा व व्यावसायिकरित्या समाजमाध्यमांचा वापर करावा, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

राजाराम कॉलेज परिसरात आयोजित राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत धान्य, तांदूळ व गुळ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी धान्य, तांदूळ, गुळ विक्री स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व खाद्य पदार्थ खरेदी केले. तसेच, विविध कृषी उत्पादनांची माहिती घेऊन शेतमालाच्या ब्रँडिंग, मार्केटिंगसाठी प्रयत्न करु, असे सांगितले.
यावेळी कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु.बी. होले, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ‘पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्व’ या घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ऑनलाइन बीजप्रक्रिया स्पर्धेतील विजेते प्रदीप शिरामे, सुरेखा पाटील, अजित सौदे या शेतकऱ्यांचा व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा पालकमंत्री श्रीपाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात गुळ, तांदूळ, काजू, भाजीपाला, नाचणी, नाचणीचे बिस्कीट आदी शेतमाल व विविध खाद्यपदार्थ दर्जेदार आहेत. जिल्ह्याला लाभलेल्या विशेष भौगोलिक स्थानाचा उपयोग करून घेऊन येथील शेती उत्पादन कोकण,गोव्यासह अन्य राज्यांच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. अनेक महामार्गांना जिल्हा जोडला जात असल्याने याचा फायदाही शेतमालाच्या वितरण व विक्री व्यवस्थेसाठी करता येईल, असे सांगून भविष्यातील विमानतळाच्या कार्गो सुविधेचा लाभ देखील शेतकरी व कृषी उद्योजकांना थेट निर्यातीसाठी होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या प्रगतशील वाटचालीत विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण वाटा असून यापुढेही कृषी, सहकार, उद्योग क्षेत्रासह सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देणे, ऊस उत्पादकता वाढवणे, पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या ऊसाची नुकसान भरपाई म्हणून अर्थसहाय्य करणे, नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करुन गट शेतीसाठी प्रोत्साहन देणे, नाचणी प्रक्रिया उद्योग सुरु होण्यासाठी अर्थसहाय्य देणे अशा माध्यमातून शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्न करत आहे.

यावेळी, प्रा. डॉ. योगेश बन, डॉ.संदीप पाटील, डॉ. सुजित हलर्नकर, डॉ.पुनम पाटील, डॉ. प्रवीण मत्तीवाडे, डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. याठिकाणी लावण्यात आलेल्या धान्य, तांदूळ, गुळ, व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स ला ग्राहकांनी भेट देवून खरेदी केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!