कोल्हापूरचा बहुमान : पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी ; कोल्हापुरात आनंदोत्सव

कोल्हापूर :

मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात झालेल्या अटीतटीची लढतीत पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकरवर मात करत २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. विशाल बनकर उपमहाराष्ट्र केसरी ठरला. पृथ्वीराजच्या विजयाने कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा होत आहे.

पृथ्वीराजने या अगोदर पुण्याच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.

पृथ्वीराज महाराष्ट्र गदेचा मानकरी ठरल्याने कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र केसरी गदेची कोल्हापूर वाट पाहत होते. अखेर पृथ्वीराज पाटीलने ही गदा पटकावून कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी गदेचा बहुमान मिळवून दिला आहे. समस्त कोल्हापूरकर पृथ्वीराजचे तोंडभरून कौतुक करत आहेत. फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करत आहेत.

पृथ्वीराज पाटीलचा परिचय —

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

विशाल बनकरचा परिचय

विशाल बनकर, पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गावात १९८७ रोजी विशाल बनकरचा जन्म झाला. विशाल महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या आहे. गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे, सुरुवातीला भारत भोसले खवसपूर तालमीत ५ वर्ष प्रशिक्षण, मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण घेतोय. ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशाल बनकरने सुवर्णपदक पटकावले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!