जुलैअखेर चालणार पिककर्ज भरणा प्रक्रिया.,
थकित गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा..
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पिककर्ज वसुलीसाठी एक महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे, दरवर्षी नियमितपणे ३० जूनअखेर चालणारी पिककर्ज परतफेडीची ही प्रक्रिया यावर्षी जुलै -२०२१ अखेरपर्यंत चालणार आहे. या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरविले जाणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए बी. माने यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे…..
या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या व बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही कर्जाच्या परतफेडीची वाढीव मुदत मिळून शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजनेचाही लाभ होणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी नवीन कर्ज योजनेस पात्र ठरणार आहेत. बँकेच्या स्टाफ समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
या निर्णयामुळे ३० जून २०२१ पर्यंत कर्ज परतफेडीची मुदत असलेल्या पीक कर्जाला ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. २०२० -२०२१ चे मंजूर ऊस पीक व खावटी कर्ज वितरणास ३१ जुलै २०२१ अखेर मुदतवाढ मिळणार आहे. तसेच, ज्या विकास संस्थांची ऊस पीक कर्ज खाती ३० जून २०२१ रोजी नव्याने थकीत गेलेली आहेत, अशा कर्ज खात्यांवर जुलैअखेर आलेल्या वसूल रकमेवर दंड व्याजाची आकारणीही केली जाणार नाही.