करवीर :
करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी मीनाक्षी भगवान पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले.यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती सुनील पोवार व सर्व सदस्य उपस्थित होते.
पंचायत समिती वर पालकमंत्री सतेज पाटील,व आमदार पी. एन पाटील यांची सत्ता आहे.
सभापती अश्विनी धोत्रे यांनी ठरल्याप्रमाणे आपला कार्यकाल संपल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे सभापती पद रिक्त झाले होते.
सभापतिपदासाठी काँग्रेसच्या, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाच्या सदस्या मिनाक्षी पाटील,व मंगल पाटील इच्छुक होत्या. यापैकी कोणाला सभापती पदाची लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान नेत्यांनी मीनाक्षी पाटील यांची निवड केल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला.
आज अकरा वाजता सभापतीपदासाठी नामनिर्देशन
दाखल करण्यास सुरुवात झाली, यावेळी मीनाक्षी भगवान पाटील यांचा एकमेव अर्ज आला. दुपारी दोन वाजता सभापती निवडीसाठी कार्यक्रमाला सुरुवात झाली. मीनाक्षी पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याला बिनविरोध घोषित करण्यात आले.
यावेळी तहसीलदार शितल भामरे मुळे यांच्या हस्ते नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य सागर पाटील, विजय भोसले, अविनाश पाटील, अर्चना खाडे, इंद्रजीत पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती व सदस्य अश्विनी धोत्रे, उपसभापती सुनील पोवार यांचे मनोगत झाले.नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांनी सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी मीनाक्षी पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती सभागृहाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलालाची उधळण केली.