रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद : कास पठार पर्यटकांना यावर्षी २५ ऑगस्टपासून खुले करण्यात येणार
वाई :

जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी २५ ऑगस्टपासून खुले करण्यात येणार आहे. कास पठारावर रानहळद(चवर) आभाळी, निलिमा गेंद आदी फुले उमलण्याची नव्याने कळ्या येणं सुरू झालेलं आहे. अधून-मधून पठारावर ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे.वातावरणाने आज पर्यंत साथ दिली आहे. यापुढेही वातावरणात मोठे बदल झाले नाहीत तर पठार पर्यटकांना खुले होणार आहे. करोनाचे नियम पाळत ऑनलाइन बुकिंगने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
आता हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने पठारावर रानहळद(चवर) आभाळी, निलिमा गेंद काही विविध जाती-प्रजातींच्या फुलांच्या तुरळक कळ्या उमलू लागल्या आहेत. येत्या दहा पंधरा दिवसांत पठारावर रंगीबेरंगी फुले पहायला मिळणार आहेत. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिच्छे पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गतच कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने देखील हे पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचे नियम पाळून ‘ऑनलाइन’ नोंदणी करतच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी प्रति माणसी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. वाहनतळ, गाइड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहेत. या बैठकीला सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व सहा गावचे वनसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजून फुलांचा नेहमीचा बहर सुरू झालेला नाही. रानहळद (चवर) आभाळी, नीलिमा, गेंद या प्रजातींची फुले तुरळक प्रमाणात दिसत आहेत. कास पठारावर दिसणारा नेहमीचा बहर दिसण्यासाठी पावसासोबतच काही प्रमाणात ऊन पडणेही आवश्यक आहे. यंदा सलग असलेल्या पावसाळी वातावरणामुळे फुलांच्या बहरासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हंगाम पर्यटकांना खुला करण्यासाठी व पदाधिकारी निवड करण्यासाठी नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागीलवर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २१ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. “फुलांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचारी प्रशिक्षण व इतर आवश्यक तयारी झाली. २५ ऑगस्टनंतर दोन-तीन दिवसांत अधिकृतपणे हंगाम सुरू करण्यात येईल.”, असं वनक्षेत्रपाल आर एस परदेशी यांनी सांगितलं.
करोनाचे नियम पाळून ऑनलाइन बुकिंगनेच पठारावर प्रवेश दिला जाणार असून प्रति माणसी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. वाहन पार्किंग, गाईड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहेत. या बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व सहा गावचे वनसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.