आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावले उचला : एकनाथ पाटील : विविध मागण्यांसाठी कुंभी कारखान्यास निवेदन
करवीर :
कामगारांचे पगार, निवृत्ती नंतरची देणी, सवलतीची साखर,तोडणी वहातूक अशी देणी थकल्याने सर्व घटकांच्यामध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. कारखान्याची आर्थिक कोंडी झाली असेल तर या सर्व घटकांना विश्वासात घेऊन आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावले उचला, आम्ही आपल्याबरोबर आहे. यात कमीपणा मानू नका की राजकीय मानापमान समजू नका, असे प्रतिपादन यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केले.
आज राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन कुंभी कारखान्यास दिले.
कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी एकनाथ पाटील म्हणाले, सवलतीचे साखरेचे दर वाढवूनही सभासदांना वेळेत सवलतीची साखर मिळेना.पगार थकले आहेत तोडणी वहातूक थकलेली आहे याच बरोबर कारखान्यावर असलेल्या कर्जाची चर्चा सध्या सभासदांच्यात सुरू असून असलेल्या कर्जाच्या व्याजाचा बोजा पडत आहे.यासाठी यशवंत बँकेकडून दिलेल्या कर्जावरील दोन टक्के व्याज कमी करण्याचे आश्वासन देत कारखान्याचे आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी कमी पणा मानू नका असा सल्ला दिला.
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले
सभासदांना सवलतीची साखर मिळालेली नाही, शेतकरी पुरामुळे मेटाकुटीला आला आहे ,अशा वेळी ताबडतोब साखर देण्यात यावी, कामगारांचे पगार थकित आहेत ,2017 – 18 चे शंभर रुपये उस बिलाचे थकीत आहेत, कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा यासाठी मिळून प्रयत्न करूया अशी मागणी केली.
प्रा. टी. एल. पाटील यांनी कारखाना अडचण असेल तर वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली.
राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले, कामगारांनी प्रशासनाला नेहमी सहकार्य केले आहे त्यांची देणी थकल्याने विमा,भविष्य निर्वाह निधीचे पैसे कामगारांना मिळेनात. सवलतीच्या साखरेचा प्रश्न मार्गी लावा असे सांगितले
यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील म्हणाले, मागील चार वर्षात साखरेचे सातत्याने दर घसरले व उठाव नव्हता.पण सध्या साखरेला बेस प्राईस मिळत असून उठाव वाढला आहे. या महिन्यात अडीच लाख साखर विकली आहे. अजून मागणी वाढली आहे यामुळे पैशाची उपलब्धता होत आहे. कामगारांच्या पगाराचा बँकलॉग भरून काढत आहे. सवलतीची साखर सुरू करणार आहे. तोडणी वहातूक बीले ११ कोटी दिले आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन कारखान्याच्या आर्थिक अडचणीवर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक आनंदराव पाटील,सज्जन पाटील,निवास पाटील, दादा पाटील भगवंत सुर्यवंशी नामदेव पाटील, एस.के.पाटील (कोपार्डे) ,भगवान देसाई आदी उपस्थित होते.