मुंबई :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल आज जाहीर झाला, दुपारी १२ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला.
सीबीएसई,दहावीचा निकाल हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम परीक्षांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आला असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सीबीएसईचे १० वीचे ९९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सुप्रीम कोर्टात सीबीएसईने ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. दरम्यान ३० जुलैला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली होती. त्यानुसार आज दुपारी १२ वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दहावीच्या २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द झाल्यामुळे, विद्यार्थ्यांचे त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले गेले आहे. ज्यात प्रॅक्टिकल, युनिट टेस्ट, प्री-बोर्ड, मिड टर्म यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच बोर्ड परीक्षेशिवाय दहावीचे निकाल जाहीर करत आहे त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे.
गेल्या वर्षी, एकूण १८,८५,८८५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७,१३,१२१ विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा ९१.४६ टक्क्यांसह उत्तीर्ण केली. सीबीएसईने “नापास” शब्दाऐवजी “Essential Repeat” चा वापर विद्यार्थ्यांच्या निकालावर केला असल्याचे म्हटले आहे.