कोल्हापूर :
जिल्हयामध्ये सद्यस्थितीत कोव्हीड -19 संसर्ग फार वेगाने वाढत आहे व दर आठवडयाला रुग्ण दुप्पट होत आहेत, त्यामुळे शासकीय रुग्णालये व कोव्हिदड केअर सेंटर मधील खाटा कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कोरोना रूग्ण व्यवस्थापनासाठी खासगी रूग्णालयांचे नियंत्रणाखाली योग्य खासगी हॉटेल व स्वयंसेवी संस्थांच्या कोव्हिड केअर केंद्रांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिली आहे.
जिल्हयामध्ये कोव्हीड -19 ( दुसरी लाट ) संसर्गाचा प्रादुर्भाव मोठया संख्येने वाढत असल्याचे निर्दशनास येत आहे. कोव्हीड -19 पॉझिटिव्ह रुग्णांवर त्या- त्या तालुक्यातील स्थानिक स्तरावर तयार करण्यात येणाऱ्या CCC मध्ये व शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये देखील वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हयामध्ये दिवसे-दिवस कोव्हीड -19 विषाणू बाधित रुग्णांची संख्येमध्ये वाढ होत असल्याने संबंधित रुग्णांना तालुक्यातील CCC, शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले जात आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयातील सर्व बेडचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे. रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यास, गंभीर रुग्णांना CCC, शासकीय व खासगी रुग्णांलयामध्ये बेड उपलब्ध होत नसल्याचे निर्दशनास येत आहे.
त्याअनुषंगाने तालुकास्तरीय समितीने आपल्या अधिनस्त तालुक्यातील CCC, शासकीय व खासगी रुग्णांलयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांची व उपलब्ध बेड संख्या यांची खातरजमा करावी. तसेच आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, यांच्याशी सल्लामसलत करून लक्षणे नसलेल्या किंवा दाखल झाल्यानंतर पुढील 3 दिवसांमध्ये कोणतेही लक्षणे नसलेले रुग्ण, संबंधित खासगी रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली सर्व सुविधा असलेल्या खासगी हॉटेलमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यास अशी खासगी रुग्णालये तयार असतील, तर त्यांना त्यांच्या जबाबदारीवर त्या ठिकाणी ठेवण्यास अनुमती देण्यास हरकत नाही. परंतु, याबाबत संबंधित खाजगी रुग्णालये व सुविधायुक्त योग्य हॉटेल यांचेकडून योग्य त्या नमुन्यात बंधपत्र लिहून घ्यावे. यासाठी तालुका मुख्यालयासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक, उर्वरित ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिका हद्दीसाठी संबंधित मुख्याधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक / तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्याने अशी हॉटेल्स संबंधित रुग्णालयास जोडण्याबाबत कार्यवाही करावी. अशा खासगी हॉटेल्समध्ये निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची व कोव्हीड -19 रुग्णांनी वापरलेल्या वस्तुंची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित हॉटेल व रुग्णालयांची राहील. शासकीय कोव्हीड केअर केंद्रामध्ये उपलब्ध खाटा अशा रुग्णांनी मागणी केल्यास, त्यांना प्राधान्याने देण्यात याव्यात.
त्याचप्रमाणे आपले अधिनस्त खासगी रुग्णालय व हॉटेल व्यावसायिक यांची बैठक घेऊन लक्षणे असणाऱ्या व नसणाऱ्या कोव्हीड -19 पॉझिटिव्ह रुग्ण यांना हॉटेलमध्ये उपलब्ध करावयाच्या खोल्या, खासगी रुग्णालयामार्फत होणारा औषधोपचार याबाबत समन्वय राखणेसाठी सूचना देणे.
तसेच काही स्वयंसेवी संस्थांकडूनही कोव्हिड केअर केंद्र सुरू करण्याबाबत मागणी आल्यास, उपरोक्त नमूद तत्वे त्याचप्रमाणे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सर्व सुविधांसहित उपलब्ध असतील तर तपासणी अंती अशा कोव्हीड केअर केंद्रांना तालुका आरोग्य अधिकारी / वैद्यकीय अधीक्षक / मुख्याधिकारी नगरपालिका यांनी त्यांचे त्यांचे कार्यक्षेत्रासाठी अनुमती देण्यात हरकत नाही. परंतु स्वयंसेवी संस्थानी सुरु केलेली कोव्हीड केअर केंद्रे अथवा खाजगी रुग्णालयांनी हॉटेल सोबत केलेली रुग्ण व्यवस्थाही त्या-त्या संस्थेच्या खर्चाने / जबाबदारीवर असेल. याबाबतचे सनियंत्रण तालुकास्तरीय समितीमार्फत करण्यात यावे.